MPCB चा धडाका; नियम मोडणाऱ्या तीन बड्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

पाताळगंगा नदी प्रदूषण: MPCB चा धडाका; नियम मोडणाऱ्या तीन बड्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

खालापूर | प्रतिनिधी
पाताळगंगा नदीपात्रात घातक रासायनिक सांडपाणी सोडून नदीचे गंभीर प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) कारवाईचा बडगा उगारला आहे. पत्रकार राकेश काशिनाथ खराडे यांनी या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध स्तरावर निवेदने देऊन पाठपुरावा केला होता. त्यांच्या या आक्रमक भूमिकेची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपन्यांना नोटीस बजावत कारवाईचे आदेश दिले आहेत.

नेमका प्रकार काय?
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील काही कंपन्यांकडून प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी थेट नदीत सोडले जात होते, ज्यामुळे जलप्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत पत्रकार राकेश खराडे यांनी पत्राद्वारे तक्रार करत तत्काळ चौकशी करून कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने नदी परिसरातील उद्योगांची पाहणी केली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

कारवाई झालेल्या कंपन्या:
प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खालील तीन कंपन्यांना कारवाईचे आदेश/इशारा पत्र बजावले आहे:
१. मेसर्स द बॉम्बे डायिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (पॉलिस्टर डिव्हिजन, पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र).
२. मेसर्स गतिक सिंथेसिस एलएलपी (प्लॉट नं. ई-१०१ व १०२, अतिरिक्त पाताळगंगा एमआयडीसी, रसायनी).
३. मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (लॅब डिव्हिजन, प्लॉट नं. ए-३, बी-१ ते बी-३, एमआयडीसी पाताळगंगा)
प्रशासनाचा इशारा:
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप-प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने घालून दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित उद्योगांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमुळे प्रदूषण पसरवणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.
पत्रकार राकेश खराडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रदूषकांविरुद्ध उचललेल्या या पावलाचे स्थानिक नागरिकांकडून स्वागत होत आहे.

टिप्पण्या