कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द
कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) पक्षाच्या बेकायदेशीर पद नियुक्त्या ; जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द
"पदांचा गैरवापर केल्यास पोलिसांत तक्रार दाखल करणार" - जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड
वावोशी | जतिन मोरे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रायगड जिल्ह्यात रविवारी झालेल्या एका कार्यक्रमाने खळबळ उडवून दिली आहे. कर्जत येथील शेळके हॉलमध्ये काही जणांना आरपीआय (आठवले) पक्षातील पदांची नेमणूक करण्यात आली, मात्र ती संपूर्णतः बेकायदेशीर असल्याचा स्फोटक आरोप जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी केला आहे.
जिल्हाध्यक्ष गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे की, कर्जत तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी खालापूर तालुका अध्यक्ष (पूर्व) महेंद्र धनगांवकर यांच्या लेटरहेडवर काही नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या नियुक्त्या करण्यात आलेल्या व्यक्ती हे आरपीआय (आठवले) पक्षाचे अधिकृत सदस्य सुद्धा नाहीत. याबाबत जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्याशी कोणतीही चर्चा न करता हा प्रकार राबवण्यात आला असून या प्रकरणाला तीव्र आक्षेप घेत जिल्हाध्यक्षांनी सर्व नियुक्त्या रद्द केल्या असून, त्या बेकायदेशीर ठरवल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या पदांमध्ये नितीन मोरे (खालापूर तालुका उपाध्यक्ष), मनोहर कांबळे (सचिव, खालापूर तालुका), विजय वाघमारे (कामगार आघाडी खालापूर तालुका), दिनेश मोरे (छत्तीशी विभाग अध्यक्ष), मोहन साळुंके (डोणवत ग्रामशाखा अध्यक्ष) यांचा समावेश आहे. त्यामुळे जर या पदांचा गैरवापर होऊन पक्षाची बदनामी केली गेली, तर संबंधितांवर पोलिसात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment