लोधीवलीच्या माजी उपसरपंच मोहिनी निकाळजे काळाच्या पडद्याआड
लोधीवलीच्या माजी उपसरपंच मोहिनी निकाळजे काळाच्या पडद्याआड
२५ जून रोजी वरोसे येथे पुण्यानुमोदन व शोकसभा; २४ जूनला धम्मप्रवचनाचे आयोजन
वावोशी /जतिन मोरे : खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत लोधीवलीच्या माजी उपसरपंच तथा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोहिनी किशोर निकाळजे यांचे सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे लोधीवली परिसरासह सामाजिक, राजकीय क्षेत्रात व बौद्ध समाजामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कालकथित मोहिनी निकाळजे या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे खालापूर तालुका सेक्रेटरी तथा अखिल भारतीय बौद्ध महासंघ रायगड जिल्हा उपाध्यक्ष किशोर निकाळजे यांच्या पत्नी होत्या. उपसरपंच पदावर कार्यरत असताना त्यांनी ग्रामविकास व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यानुमोदन व शोकसभेचे आयोजन गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मु. वरोसे, पो. लोधीवली, ता. खालापूर, जि. रायगड येथे करण्यात आले आहे. तसेच बुधवार, दि. २४ जून रोजी सायंकाळी ७ वाजता धम्मप्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष अनंता शिंदे हे प्रवचन देणार आहेत. या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते तसेच बौद्ध बांधवांनी उपस्थित राहावे अशी विनंती निकाळजे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा