सवणे येथील HPCL प्लांटमधील हजारो गॅस सिलेंडर पुरात वाहून गेले; कंपनीचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

सवणे येथील HPCL प्लांटमधील हजारो गॅस सिलेंडर पुरात वाहून गेले; कंपनीचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

प्रतिनिधी / रसायनी 
      पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी परिसरातील जांभीवली धरणातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रचंड विसर्गामुळे सवणे हद्दीतील 'एच.पी.सी.एल.' (HPCL) कंपनीच्या गॅस प्लांटमध्ये पूर आला असून, आवारातील हजारो गॅस सिलेंडर पाण्याचा प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. नदीपात्रातून शेकडो सिलेंडर वाहत येत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सिलेंडर नदीबाहेर काढले आणि आपापल्या घरी पळवून नेले. 
या घटनेबाबत 'एचपीसीएल' कंपनीचे अधिकारी कुंदन कुमार यांच्याकडे विचारणा केली असता, पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे सिलेंडर वाहून गेल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, वाहून गेलेल्या सिलेंडरपैकी किती भरलेले होते आणि किती रिकामे, तसेच एकूण किती सिलेंडर वाहून गेले, याचा कोणताही आकडा माहिती नसल्याचे सांगत त्यांनी कंपनीची अनभिज्ञता दर्शवली.
    कंपनीच्या या ढिसाळ कारभारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी घरात नेऊन ठेवलेले सिलेंडर जर गॅसने भरलेले असतील किंवा त्यातून गळती झाली, तर निवासी भागात मोठी दुर्घटना घडू शकते. या गंभीर प्रकारामुळे कंपनीचा सुरक्षेबाबतचा अक्षम्य निष्काळजीपणा उघड झाला असून, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या संबंधित कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि नागरिकांनी नेलेले सिलेंडर तातडीने जप्त करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

MPCB चा धडाका; नियम मोडणाऱ्या तीन बड्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

लोधीवलीच्या माजी उपसरपंच मोहिनी निकाळजे काळाच्या पडद्याआड