“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन
“AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीत गुंतवणुका करणाऱ्या नागरीकांना आर्थिक गुन्हे शाखा रायगड तपास यंत्रणेद्वारे जाहीर आवाहन
झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेक मार्केटिंग कंपन्यांना सर्वसामान्य नागरिक बळी पडत आहे. दोन वर्षांपूर्वी उदयास आलेल्या "AMP DIRECT" कंपनीने देखील जनतेला खोटी आश्वासने दाखवत कोट्यावधी रुपयांची लयलूट केली. अनेकांनी आपल्या जमिनीचा पैसा यामध्ये गुंतवणूक केला तर काही जणांनी आपली बँकेची एफ.डी तोडून तर काहींनी आपली जमापुंजी या मार्केटिंग कंपनीत गुंतवून आपले आर्थिक नुकसान केले आहे. मात्र काही दिवसात कंपनीचे मालक आरोपी मंगेश वासुदेव पाटील यानी सर्वांची फसवणूक केल्याचे समोर आल्याने सर्व गुंतवणूकदारांना याचा धक्का बसला. त्यानंतर सर्वांनी त्यावर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यासाठी धाव घेतली होती. त्या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा रायगड-अलिबाग येथे अंतिम टप्यात चालु आहे.
आर्थिक गुन्हे शाखा रायगड यांच्यावतीने, रायगड जिल्हयातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की, "AMP DIRECT" या बनावट मार्केटिंग कंपनीचे मालक आरोपी मंगेश वासुदेव पाटील, रा. जामरूंग, ता. खालापुर, जि. रायगड यांनी एजंट लोकांच्या मदतीने रायगड जिल्हयातील खोपोली, खालापुर, कर्जत, पेण या तालुक्यासह अनेक गरीब, गरजु लोकांना सलग २० महीन्यात गुंतवणुक रक्कमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवुन हजारो गुंतवणुकदारांकडुन कोटयावधी रूपयाच्या रक्कमा स्विकारून त्या रक्कमेचा आरोपी यानी अपहार केला आहे.
त्यामुळे "AMP DIRECT" या मार्केटिंग कंपनीचे मालक मंगेश पाटील यांचे विरूध्द दि.२८/०१/२०२१ रोजी खोपोली पोलीस ठाणे, जि. रायगड येथे गुन्हा रजि. नं. २२/२०२१ कडे गुन्हयाची नोंद करण्यात आली असुन आरोपी मंगेश वासुदेव पाटील यास तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा रायगड-अलिबाग येथे अंतिम टप्यात चालु आहे.
यापुर्वी "AMP DIRECT" या मार्केटिंग कंपनीत आरोपी मंगेश वासुदेव पाटील याचेकडे नागरीकांनी पैसे गुंतविलेले असल्यास आणि आपली फसवणुक झालेली असल्यास आपण आपल्या फसवणुकी बाबतची माहीती देण्यासाठी उपलब्ध पुराव्यासह तात्काळ आर्थिक गुन्हे शाखा रायगड-अलिबाग येथे तपास यंत्रणेशी संपर्क साधावा. असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखा रायगड यांनी खालील पत्राद्वारे केले आहे.