“पेण पोलीस विभागाचा हिरवा संकल्प : हरित महाराष्ट्र अभियानातून वृक्षलागवड”
“पेण पोलीस विभागाचा हिरवा संकल्प : हरित महाराष्ट्र अभियानातून वृक्षलागवड”
पेण | जतिन मोरे
"हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानाला आज पेण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सुंदर प्रतिसाद मिळाला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमात स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांनी सहभागी होत वृक्षारोपण केले. त्यांच्यासोबत वाचक पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे, पोलीस अधिकारी शाम पाटील व दत्ता साळवी यांनीही उत्साहाने वृक्षारोपण केले. पोलीस अधिकाऱ्यांच्या या सहभागामुळे समाजात पर्यावरणाविषयी सकारात्मक संदेश पोहोचत असून, पोलीस विभाग फक्त कायदा-सुव्यवस्था सांभाळत नाही तर पर्यावरण संवर्धनासाठीही कटीबद्ध असल्याचे एक उत्तम उदाहरण घालून दिले आहे. राज्यात झपाट्याने होत असलेल्या औद्योगिकीकरण, नागरीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. याला तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” हे अभियान हाती घेतले असून, त्याचाच एक भाग म्हणून पेणमध्येही वृक्षलागवडीचे विविध उपक्रम होत आहेत. पेण उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या आवारात लावलेली झाडे केवळ हिरवळ वाढविण्यासाठी नाहीत, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ हवा, थंडावा व सुरक्षित पर्यावरण यासाठी एक भक्कम पाऊल असल्याचे प्रतिपादन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत पोलीस विभागाचा हा अभिनव उपक्रम इतर शासकीय कार्यालयांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Comments
Post a Comment