पेणमध्ये जनआक्रोश : हेटवणे जलबोगदा आणि जेएसडब्ल्यू प्रदूषणाविरुद्ध धरणे आंदोलन पेटले

“तालुक्याचे पाणी वाचवा – प्रदूषण रोखा” घोषणांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर दणाणला; हजारोंचा सहभाग, प्रशासनावर निष्क्रीयतेचे आरोप

पेण | जतिन मोरे 
    हेटवणे जलबोगदा प्रकल्पाचे बेकायदेशीर काम तात्काळ थांबवावे आणि जेएसडब्ल्यू डोलवी प्रकल्पाच्या प्रदूषणकारी विस्ताराला मंजुरी रद्द करावी या दुहेरी मागण्यांसाठी पेणमध्ये रविवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. तालुक्याच्या अस्तित्वाशी निगडित ‘पाणी वाचवा–प्रदूषण रोखा’ या लढ्यामुळे आंदोलनाला प्रचंड तीव्रता लाभली आहे.
          हेटवणे धरणातून मुंबईकडे पाणी वळवण्यासाठी सुरू असलेल्या ३.२ मीटर व्यासाच्या जलबोगद्याविरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी ठामपणे मागणी केली की, “परवानगीशिवाय सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवले पाहिजे.” नंदाताई म्हात्रे, समीर म्हात्रे, अभिमन्यू म्हात्रे यांनी प्रशासनावर निष्क्रीयतेचा आरोप ठेवत सांगितले की, “तालुक्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा बोगदा कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही.” यानंतर आंदोलन जेएसडब्ल्यू च्या प्रदूषणकारी विस्ताराभोवती केंद्रित झाले. दि. २२ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पर्यावरणीय जनसुनावणीत कंपनीने आपल्या “समर्थक” कामगार व ठेकेदारांना आणून प्रक्रिया कलंकित केल्याचा आरोप के. पी. पाटील, संजय चवरकर व सदानंद ठाकूर यांनी केला. के. पी. पाटील म्हणाले, “ही जनसुनावणी लोकांचा आवाज ऐकण्यासाठी होती, कंपनीचा कौल मिळवण्यासाठी नव्हे. त्यामुळे हा अहवाल तात्काळ रद्द केला पाहिजे.” आंदोलनादरम्यान नंदाताई म्हात्रे यांनी मेघा इंजिनीअरिंगने इलेक्ट्रोरल बाँडद्वारे ६६४ कोटी रुपयांचा निधी राजकीय पक्षांना पुरवल्याचा धक्कादायक आरोप करत सत्ताधाऱ्यांवर थेट प्रहार केला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झेमसे यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींवर निशाणा साधत सवाल केला की, “परवानगीशिवाय एवढे भलेमोठे जलबोगद्याचे काम सुरुच कसे होते? हक्काचे पाणी पळवले जात असताना प्रतिनिधी एवढे गप्प का बसलेत?” या आंदोलनात विविध संघटनांचा मोठा सहभाग होता. शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे, छावा संघटनेचे जितेंद्र ठाकूर, ‘माझं पेण’चे राजू पाटील, फाईट फॉर राईटचे संजय थळे, बहुजन वंचित आघाडीचे सुनिल धामणकर, वाशीचे माजी सरपंच गोरख पाटील, सामाजिक कार्यकर्त्या समिधा पाटील, उद्योजक तुषार पाटील, राजूदादा पाटील, मनिषाताई थवई, शामकांत म्हात्रे, जयसन पाटील, चंदू म्हात्रे, लिलाधर म्हात्रे, किरण म्हात्रे, गणेश तांडेल, प्रभाकर पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. महिला भगिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने आंदोलनाला विशेष बळ मिळाले. याशिवाय हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रकाश माळी, सी. आर. म्हात्रे (सर), राजेंद्र म्हात्रे, प्रितेष माळी, योगेश मढवी आदी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली. “JSW च्या प्रदूषणकारी प्रकल्पाला वा हेटवणे जलबोगद्यास परवानगी दिल्यास आणखी व्यापक जनआंदोलन केले जाईल.” असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. हेटवणे धरणाचा जलसाठा कमी झाल्यास खारेपाटातील सुपीक शेती व पिण्याच्या पाण्यावर गंभीर प्रश्न निर्माण होईल, तसेच जेएसडब्ल्यू च्या प्रदूषणामुळे हवा, माती व सागरी परिसंस्था धोक्यात येईल, असा ठाम इशारा देत आंदोलनकर्त्यांनी जनतेला जागरूक राहण्याचे आवाहन केले. पेण तालुका अक्षरशः जनआक्रोशाने दणाणून गेला असून, पुढील काळात ही चळवळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

___________🔸🔸🔸___________
 
      (आंदोलनकर्त्यांच्या ठळक प्रतिक्रिया)

      “तालुक्याच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा जलबोगदा कोणत्याही परिस्थितीत चालू देणार नाही. परवानगीशिवाय सुरू असलेले हे काम तात्काळ थांबवले पाहिजे.”
       - नंदाताई म्हात्रे (सामाजिक कार्यकर्त्या)
                     🔸🔸🔸

“ही जनसुनावणी लोकांचा आवाज ऐकण्यासाठी होती, कंपनीचा कौल मिळवण्यासाठी नव्हे. त्यामुळे JSW च्या विस्तार प्रकल्पाला मंजुरी देणारा अहवाल तात्काळ रद्द केला पाहिजे.”
        -  के. पी. पाटील (सामाजिक कार्यकर्ते)
                      🔸🔸🔸

“आपल्या डोळ्यांसमोर हक्काचे पाणी पळवण्यासाठी जलबोगद्याचे काम होत आहे. मग प्रशासन व निवडून आलेले प्रतिनिधी एवढे गप्प का बसलेत?”
          - राजेंद्र झेमसे (सामाजिक कार्यकर्ते)

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द