तांबाटी ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण
तांबाटी ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण — विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात...
३.५ लाख उत्पन्नावरून ५ कोटींच्या उंचीवर प्रवास; पारदर्शक आणि कार्यसंस्कृतीचा आदर्श नमुना
वावोशी | जतिन मोरे
खालापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रगतिशील आणि श्रीमंत ग्रुपग्रामपंचायत तांबाटीने विकासाचा नवा टप्पा गाठला आहे. सन १९९२ मध्ये ३.५० लाख वार्षिक उत्पन्नावर कार्यरत असलेली ही ग्रामपंचायत आज तब्बल ५ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळवणारी आदर्श ग्रामपंचायत ठरली आहे. या ग्रामपंचायतीच्या नवीन तीन मजली प्रशस्त प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अवजार बँकेचे देखील उद्घाटन करण्यात आले असून ही अवजार बँक रायगड जिल्ह्यातील पहिली अवजार बँक ठरली आहे.
विकासाच्या वाटेवर सातत्य आणि जबाबदारी
तांबाटी ग्रामपंचायतीने गेल्या तीन दशकांत औद्योगिक वाढ, CSR निधीचा प्रभावी वापर आणि ग्रामनिधीचे नियोजनबद्ध व्यवस्थापन यामुळे तालुक्यात आणि जिल्ह्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे. माजी सरपंच शरद कदम यांनी १९९३ च्या काळातील आठवणी सांगत ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा आलेख उलगडला. “त्या काळात मर्यादित साधनसामग्री असूनही ग्रामस्थांच्या एकतेच्या बळावर विकास शक्य झाला. आजची इमारत ही त्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ असल्याचे त्यांनी म्हटले.
पुरस्कारांनी भरलेला गौरवप्रवास
ग्रामसेवक प्रशांत कदम यांनी सांगितले की, वाढत्या लोकसंख्येमुळे आणि ग्रामपंचायतीच्या दप्तरभारामुळे प्रशस्त प्रशासकीय इमारत उभारणे आवश्यक ठरले. २०२० ते २०२५ या कालावधीत तांबाटी ग्रामपंचायतीने तब्बल ८ पुरस्कार मिळवले आहेत. ‘माझी वसुंधरा 4.0’ अंतर्गत कोकण विभागात प्रथम, राज्यात सातवा क्रमांक, आणि ५० लाख रुपयांचे बक्षीस (२०२४). ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा’ रायगड जिल्हा प्रथम क्रमांक, ६ लाख रुपयांचे पारितोषिक. तसेच तांबाटी ही तालुक्यातील प्रथम ISO प्रमाणित ग्रामपंचायत ठरली आहे. तर ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम यांना वैयक्तिक ११ पुरस्कार, त्यात ‘रायगड जिल्हा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार’ यांचा समावेश आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि सहकार्य
या कार्यक्रमास गटविकास अधिकारी संदीप कराड, विस्तार अधिकारी शेलेंद्र तांडेल, बांधकाम अभियंते अनिल जाधव, अल्पना जाधव, CSR विभाग प्रमुख तानाजी चव्हाण (गोदरेज कंपनी), किरण वैद्य (MNS), भावेश रावळ (टाटा कंपनी), तसेच माजी सरपंच अनिल जाधव, संदेश पाटील, विविध गावांचे सरपंच, सदस्य, ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होता.
तांबाटी ग्रुपग्रामपंचायत – एकतेचा आणि विकासाचा आदर्श नमुना
तांबाटी ग्रामपंचायतीचा हा प्रवास तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरला आहे. कमी उत्पन्नातही योग्य नियोजन, एकजूट आणि पारदर्शक कारभाराद्वारे मोठा विकास शक्य असतो, हे तांबाटी ग्रुपग्रामपंचायतने सिद्ध केले आहे.
🔸🔸🔸
“आमच्या ग्रामपंचायतीची प्रगती ही माझ्या नेतृत्वाची नव्हे, तर सर्व ग्रामस्थ, माजी सरपंच, सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांची देण आहे. आज आम्ही ISO मानांकन प्राप्त केले आहे आणि राज्यस्तरावर स्पर्धा करीत आहोत. ही आमच्या एकतेची फलश्रुती आहे.”
सरपंच - संतोष आमले, ग्रुपग्रामपंचायत तांबाटी
🔸🔸🔸
“२०२० ते २०२५ या काळात ग्रामपंचायतीच्या कामाचा मोठा विस्तार झाला. वाढत्या दप्तरभारामुळे प्रशस्त इमारतीची गरज भासली. आज ही इमारत उभी राहिली आहे, आणि ‘माझी वसुंधरा’सारख्या उपक्रमांतून मिळालेल्या यशाने तांबाटीचे नाव राज्यभर झळकले आहे.”
- प्रशांत कदम, ग्रामपंचायत अधिकारी ग्रुपग्रामपंचायत तांबाटी
🔸🔸🔸
“आमच्या कार्यकाळात या इमारतीचा पाया रचला, आणि पुढील सरपंचांनी तो पूर्णत्वास नेला. ही इमारत तांबाटीच्या एकतेचे व सातत्यपूर्ण विकासाचे प्रतीक आहे.”
माजी सरपंच, अनिल जाधव, तांबाटी
Comments
Post a Comment