७६ लाख २० हजार रुपयांच्या निधीतून गावाला मिळाला शिक्षणाचा नवा अध्याय
हाळखुर्द गावातील १२० वर्ष जुनी उर्दू शाळेचे नूतनीकरण — आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न
७६ लाख २० हजार रुपयांच्या निधीतून गावाला मिळाला शिक्षणाचा नवा अध्याय; आमदारांच्या प्रयत्नातून ऐतिहासिक शाळेला नवे जीवन
खोपोली | जतिन मोरे
खालापूर तालुक्यातील हाळखुर्द गावात तब्बल 120 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्या शुभहस्ते शनिवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाले.
जिल्हा परिषद सेस योजनेअंतर्गत ७६ लाख २० हजार रुपयांचा निधी आमदार थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाला असून, या ऐतिहासिक शाळेला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे.
मुंबई–पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या हाळखुर्द गावातील जुनी शाळा जीर्ण अवस्थेत असल्याने तिच्या पुनर्बांधणीची गरज तीव्र होती. सामाजिक कार्यकर्ते हुसेन खान, ग्रामपंचायत उपसरपंच अजीम मांडलेकर आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन आमदार थोरवे यांच्याकडे या मागणीसाठी पाठपुरावा केला. त्यानंतर ही मागणी प्रत्यक्षात उतरली आणि आज गावातील विद्यार्थ्यांना नव्या, प्रशस्त व सुसज्ज शैक्षणिक इमारतीत शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. नव्या दुमजली इमारतीत एकूण सहा वर्गखोल्या तसेच इतर अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लोकार्पणाच्या वेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर शाळकरी विद्यार्थिनींनी आमदार थोरवे यांचे फुलांच्या वर्षावातून स्वागत केले.
“हाळखुर्द येथील उर्दू शाळेचे नूतनीकरण हे केवळ बांधकाम नाही, तर भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली ती एक गुंतवणूक असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले. तर शाळेसाठी आपली मालकी हक्कातील जागा दान करणारे मरहूम हसनमिया शेख इद्रीस करंजीकर यांचे देखील आमदारांनी विशेष कौतुक केले. या सोहळ्याला शिवसेना तालुकाप्रमुख संदेश पाटील, युवासेना विधानसभा अधिकारी रोहित विचारे, माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, माजी नगरसेवक मोहन अवसरमल, तसेच दिनेश थोरवे, हुसेन खान, हमीद अन्सारी, नदीम खान, रफिक जळगावकर, फैय्याज दुदुके, चंदन भारती, विष्णू ठोंबरे, महेश आगिवले, अतुल देशमुख, नरेश रसाळ, राकेश सुखदरे, सरपंच शबनम मुल्ला, उपसरपंच अजीम मांडलेकर, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔸🔸🔸
“हाळखुर्द येथील उर्दू शाळेचे नूतनीकरण हे केवळ बांधकाम नाही, तर भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. मतदारसंघातील सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन शाश्वत विकासाची वाटचाल सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अनेक विकासकामे पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यात प्रलंबित प्रकल्प मार्गी लावले जातील.”
- आमदार महेंद्र थोरवे
कर्जत खालापूर मतदारसंघ
Comments
Post a Comment