‘देवदूत’ आशा सेविकेचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान
‘देवदूत’ आशा सेविकेचा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान; आरोग्य सेवेत मोलाची भूमिका; मानधनवाढीसाठी अधिवेशनात मुद्दा मांडणार
वावोशी | जतिन मोरे
कर्जत–खालापूर मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य सेवेला आधार देणाऱ्या आणि जनतेच्या आरोग्याचे खरे प्रहरी ठरलेल्या आशा सेविकांचा दिवाळीनिमित्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी प्रत्येक आशा सेविकेला मानधन व मिठाई देत दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोना काळात आणि त्यानंतरच्या काळातही समाजाच्या आरोग्यासाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या आशा वर्कर्सच्या सेवाभाव व निष्ठेबद्दल आमदारांनी कृतज्ञता व्यक्त केली. “ग्रामीण भागात आरोग्य सेवेच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही देवदूतासारखे कार्य करत आहात. कठीण परिस्थितीतही सेवाभावाने काम करणाऱ्या आशा वर्कर्समुळेच सरकारची आरोग्य व्यवस्था सक्षम राहिली आहे,” असे आमदार थोरवे यांनी सांगितले. तसेच, आशा वर्कर्सना अत्यल्प मानधनावर काम करावे लागते, तरीही त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचवतात, याची दखल घेत आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. “येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आशा वर्कर्सच्या मानधनवाढीचा मुद्दा सभागृहात मांडण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. “आपल्या मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची जबाबदारी या आशा वर्कर्सनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यांच्या निष्ठेचे आणि सेवाभावाचे कौतुक करणे हे आपले कर्तव्य आहे,” अशा शब्दांत आमदार थोरवे यांनी त्यांचे अभिनंदन केले. आशा वर्कर्सच्या सन्मानाचा हा उपक्रम आमदार महेंद्र थोरवे यांच्या संवेदनशील आणि जनहितकारी नेतृत्वाचे उदाहरण ठरला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या ‘देवदूतां’ना समाजाचा मनःपूर्वक सलाम, असा स्वर या कार्यक्रमात उमटला.
Comments
Post a Comment