शेती संबंधी व पशुवैद्यकीय विभागातील हलगर्जीपणाबाबत त्वरीत कार्यवाहीची मागणी
खालापूरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी वरद विनायक शेतकरी संस्थेकडून तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
ई-पिक पाहणी, नुकसान भरपाई, फार्मर आयडी व पशुवैद्यकीय विभागातील हलगर्जीपणाबाबत त्वरीत कार्यवाहीची मागणी
वावोशी / जतिन मोरे : खालापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध तातडीच्या प्रश्नांबाबत वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्था, खालापूर तालुका – खानाव यांच्या माध्यमातून खालापूर तहसीलदार व गटविकास अधिकारी खालापूर यांना निवेदन देण्यात आले.
ई-पिक पाहणी, फार्मर आयडी व नुकसानभरपाईचे प्रश्न ऐरणीवर
या भेटीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीतील अडचणी, फार्मर आयडी न मिळणे, आंबा व भात पिकांच्या नुकसानीची भरपाई अशा प्रमुख मागण्यांवर चर्चा केली. याशिवाय पशुवैद्यकीय डॉक्टर अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणींबाबतही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी त्वरीत उपाययोजना राबवाव्यात, अशी सामूहिक मागणी करण्यात आली.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व माजी सभापतींची उपस्थिती
शेतकऱ्यांच्या न्याय मागणीला बळ देण्यासाठी रघुनाथ (भाई) शिंदे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद रायगड तसेच नरेश पाटील, मा. शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद रायगड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर केला.
शेतकरी प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
निवेदन देताना वरद विनायक शेतकरी सामाजिक संस्थेचे खंडू शिवराम पाटील (सल्लागार), कान्होजी जाधव (सल्लागार), मंगेश खंडू धामणसे (सचिव), राजेश वामनराव मोरे (उपाध्यक्ष), विजय वाघमारे (सहसचिव), दिनेश शिंदे, जयदास घोंगे,राजाराम मुसळे,विष्णू पाटील, जयवंत पाटील, गौतम ओव्हाळ (मा. सरपंच, चिलठण), आदी पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment