वावोशीचे शर्यतप्रेमी व कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर यांचे निधन

वावोशीचे शर्यतप्रेमी व कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर यांचे निधन; रामनवमी कुस्ती स्पर्धेचे प्रमुख पंच, माजी पैलवान व सामाजिक कार्यकर्त्याला गावाचा भावपूर्ण निरोप

वावोशी | जतिन मोरे  
     वावोशी गावातील बैलशर्यती आणि कुस्तीची आवड जिवंत ठेवणारे, क्रीडासंस्कृतीचे जतन करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरिश्चंद्र हातनोलकर (वय ७९) यांचे २५ डिसेंबर २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने वावोशीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
          रामनवमीच्या निमित्ताने वावोशी येथे दरवर्षी आयोजित होणाऱ्या कुस्ती स्पर्धांमध्ये रायगड जिल्ह्यासह विविध भागांतील नामवंत व गाजलेले पैलवान सहभागी होत असत. या कुस्तीच्या आखाड्यात हरिश्चंद्र हातनोलकर हे प्रमुख पंच म्हणून निष्पक्ष व जबाबदारीची भूमिका बजावत असत. त्यांच्या निर्णयांमुळे कुस्ती स्पर्धांना विशेष प्रतिष्ठा लाभली होती. हरिश्चंद्र हातनोलकर हे स्वतः पूर्वीचे पैलवान होते. त्यांनी आपल्या तारुण्यात अनेक कुस्त्यांमध्ये बाजी मारून विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केले होते. त्यांच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. बैलशर्यतींबाबत ते विशेष शर्यतप्रेमी होते. नवीन बैलशर्यतप्रेमींना प्रोत्साहन देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि पारंपरिक शर्यतींची शिस्त व मूल्ये जपणे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असत. तसेच पशुधन वाढले पाहिजे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे या ठाम मताचे ते होते. या दृष्टीने तरुणांना जनावरांची निगा, संगोपन आणि जबाबदार शर्यतीबाबत ते मार्गदर्शन करीत असत. क्रीडाक्षेत्रासोबतच त्यांनी वावोशी ग्रामपंचायतीमध्ये लोकप्रतिनिधी (ग्रामपंचायत सदस्य) म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली होती. गावाच्या विकासासाठी तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. दरम्यान, त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी साजगाव या ठिकाणी होणार असून उत्तरकार्य व शोकसभेचा कार्यक्रम बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी, वावोशी येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने कुस्तीप्रेमी, बैलशर्यतप्रेमी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व क्रीडाविश्वातून शोक व्यक्त करण्यात येत असून, वावोशीने क्रीडासंस्कृती, शर्यतींची परंपरा आणि पशुधनवाढीचा आग्रह धरणारे एक आदरणीय मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द