शिवसेना–भाजप–आरपीआय महायुती मैदानात; उबाठावर थोरवेंची जोरदार टीका

खालापूरमध्ये महायुतीचा भगवा रणसंग्राम
    शिवसेना–भाजप–आरपीआय महायुती मैदानात; उबाठावर थोरवेंची जोरदार टीका – “घड्याळाला निष्ठावंत शिवसैनिक कधीही मतदान करणार नाही”

खालापूर | राहुल जाधव 
खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या महायुतीने दमदार शक्तीप्रदर्शन करत निवडणूक रणांगणात उडी घेतली आहे. चारही जिल्हा परिषद जागांपैकी दोन जागांवर भाजप, तर दोन जागांवर शिवसेनेचे उमेदवार, तसेच पंचायत समितीच्या आठ गणांपैकी पाच भाजप व तीन शिवसेनेचे उमेदवार अशा ठोस बलाबलासह महायुती निवडणूक लढवत असल्याची माहिती कर्जत–खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली.
        उमेदवारी अर्ज दाखल करताना संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त जनसमर्थन पाहायला मिळाले असून, यामुळे महायुतीच्या विजयाची पुनरावृत्ती निश्चित असल्याचा विश्वास आमदार थोरवे यांनी व्यक्त केला. “शिवसेना–भाजप ही पारंपरिक युती आहे. खोपोली नगरपालिकेत महायुतीच्या माध्यमातून ऐतिहासिक विजय मिळवला असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांतही भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असल्याने प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळावी, ही आमदार, खासदार आणि संपूर्ण नेतृत्वाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, महायुतीतील सर्व उमेदवारांच्या पाठीशी शिवसेना–भाजप–आरपीआय सक्षमपणे उभी राहणार असल्याचे थोरवे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, परिवर्तन विकास आघाडी व शिवसेना (उबाठा) गटावर आमदार थोरवे यांनी तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “कर्जत–खालापूर मतदारसंघात शिवसेनेचे गेली अनेक वर्षे वर्चस्व आहे. शिवसेना दुभंगली असली तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवणारा शिवसैनिक कधीही राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान करणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी ही निष्ठावंत शिवसैनिकांना मान्य नाही. उबाठा ही पक्षविक्री झालेली शिवसेना आहे.” “उबाठाचे काही नेते विकले गेले असतील, पण सर्वसामान्य शिवसैनिक आजही स्वतःला बाळासाहेबांचा शिवसैनिक मानतो. त्यामुळे तो घड्याळावर नाही, तर धनुष्यबाणावरच बटण दाबेल. कितीही आघाड्या झाल्या तरी या निवडणुकीत शिवसेना–भाजप–आरपीआय महायुतीचाच भगवा फडकेल, हे मी अभिमानाने सांगतो,” असेही थोरवे यांनी ठामपणे नमूद केले. दरम्यान, आतकरगाव जिल्हा परिषद वार्डमधून रेश्मा राजेश पाटील, खानाव पंचायत समिती गणातून भाई रघुनाथ शिंदे, सावरोली जिल्हा परिषद वार्डमधून ज्ञानेश्वर गायकवाड आणि वाशिवली पंचायत समिती गणातून माधुरी संदेश पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरताना आमदार महेंद्र थोरवे स्वतः उपस्थित होते. या घडामोडींमुळे खालापूर–कर्जत परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महायुती विरुद्ध परिवर्तन विकास आघाडी व उबाठा असा बहुकोनी आणि रंगतदार सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द