खोपोलीतील आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी अश्वपरीस फाऊंडेशनचे नगरपालिकेत निवेदन
खोपोलीतील आदिवासी वाड्यांच्या मूलभूत सुविधांसाठी अश्वपरीस फाऊंडेशनचे नगरपालिकेत निवेदन
पाणी, आरोग्य, शिक्षण, वीज व रस्ते समस्यांवर तातडीच्या उपाययोजनांचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्याकडून आश्वासन
वावोशी | जतिन मोरे : खोपोली शहरातील विविध आदिवासी वाड्यांमधील प्रलंबित समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आज खोपोली नगरपालिकेत निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण, वीजपुरवठा, रस्ते व वाहतूक तसेच शासकीय कागदपत्रांबाबतच्या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, शहरातील अनेक आदिवासी वाड्यांमध्ये नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव जाणवत असून आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. शाळांची गैरसोय व शैक्षणिक सुविधा मर्यादित असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होत आहे. तसेच रस्ते व वाहतुकीची व्यवस्था निकृष्ट असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. काही वाड्यांमध्ये वीजपुरवठा नियमित नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय जातीचा दाखला व इतर शासकीय कागदपत्रे मिळविताना नागरिकांना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागत असून अनेक कुटुंबे विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व समस्यांमुळे आदिवासी नागरिकांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास खुंटत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे व उपनगराध्यक्ष विक्रम साबळे यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन सामाजिक कार्यकर्त्या इशिका शेलार, संस्थापक अध्यक्षा, अश्वपरीस फाऊंडेशन यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांच्या वतीने सादर करण्यात आले. लवकरच सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment