साताऱ्यात जमीन गैरव्यवहाराचा पर्दाफाश – शेतकऱ्याची कोट्यवधींची फसवणूक...
साताऱ्यात जमीन गैरव्यवहाराचा पर्दाफाश – शेतकऱ्याची कोट्यवधींची फसवणूक..,
दाखविली एक, विकली दुसरी – शेतजमीन घोटाळ्यावर आरपीआय आक्रमक
वावोशी/जतिन मोरे :– सातारा जिल्ह्यातील चिमणगाव येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शेतकऱ्याला दाखविली एक जमीन आणि विकली दुसरी! शंकर घाडगे या शेतकऱ्याची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. संभाजी आबाजी भागडे यांनी व्यवहार ठरल्याप्रमाणे जागा देण्यास नकार देत स्थानिक गुंडांच्या मदतीने त्यांना मानसिक त्रास दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) सरसावली असून पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे घाडगे यांच्या न्यायासाठी निवेदन देण्यात आले आहे.
चिमणगावचे शंकर घाडगे (वय ७४) हे शेती करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी २०१६ मध्ये संभाजी भागडे यांच्याकडून ठरावीक जमिनीचा करार करून २.५० लाख रुपये दिले होते. मात्र, प्रत्यक्षात करारात नमूद केलेली जमीन न देता दुसऱ्या भूखंडावर डाव साधला गेला. या प्रकारामुळे घाडगे यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर घाडगे यांनी तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक गावगुंड आणि राजकीय ताकद वापरून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप आहे. संभाजी भागडे यांच्यासह काही लोकांनी संगनमत करून शेतकऱ्याला न्यायापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरपीआय श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी इशारा दिला की, "शेतकऱ्यांना अन्याय सहन करावा लागणार नाही. लवकरात लवकर योग्य कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल." या वेळी आरपीआयचे सातारा तालुका अध्यक्ष आप्पा तुपे, श्रमिक ब्रिगेड कोरेगाव तालुका अध्यक्ष दत्ता सावंत, संतोष घाडगे, राहूल मंगले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.