नवीन कर्जत रेल्वे स्थानकाचे नामकरण हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाने करण्याची सुधाकर घारेंची मागणी
नवीन कर्जत रेल्वे स्थानकाचे नामकरण हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाने करण्याची सुधाकर घारेंची मागणी
खोपोली / शिवाजी जाधव
नवीन कर्जत रेल्वे स्थानकाचे नामकरण हुतात्मा हिराजी पाटील यांच्या नावाने करण्याची मागणी सुधाकर घारे यांनी आज दि.७ रोजी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केली. हिराजी पाटील हे स्वातंत्र्यसंग्रामातील महत्त्वाचे सेनानी होते. ज्यांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढताना बलिदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ कर्जत स्थानकाला त्यांचे नाव देऊन त्यांना आदरांजली वाहावी, अशी स्थानिक नागरिकांचीही इच्छा आहे. कर्जत रेल्वे स्थानक रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थानक असून हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर महत्त्वाचे स्थानक आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात. तसेच, कर्जत स्थानक हे लोणावळा, पुणे, कोकण, तसेच नवी मुंबईला जोडणारे मुख्य रेल्वे जंक्शन आहे रेल्वे स्थानकांचे नामकरण हे रेल्वे मंत्रालयाच्या धोरणांनुसार, स्थानिक जनतेच्या मागण्यांच्या आधारे आणि सरकारच्या मान्यतेनंतरच होऊ शकते. यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक आहे. या मागणीला चालना देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार आदितीताई तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांना परिवर्तन विकास आघाडी मार्फत सुधाकर घारे यांनी पत्र पाठवण्यात आल्याचे ह्या वेळी सांगण्यात आले. संपूर्ण कर्जत तालुक्यातील नागरिक आणि स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासाचा सन्मान करणारे नागरिक या मागणीला जोरदार पाठिंबा देत आहेत. आता केंद्र आणि राज्य सरकारकडून पुढील निर्णयाची प्रतीक्षा कर्जतकर करत आहेत.