रामदास आठवले रणशिंग फुंकणार...
महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी रामदास आठवले रणशिंग फुंकणार
29 मार्चपासून तीन दिवस बुद्धगयेत ठाण मांडणार, मुख्यमंत्री-राज्यपालांना भेटणार...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अन्यथा देशभर आंदोलन - रामदास आठवले
वावोशी/जतिन मोरे :- बिहारमधील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाने जोरदार लढा उभा केला असून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 29 मार्चपासून बुद्धगयेत तीन दिवस ठाण मांडण्याची घोषणा केली आहे! यावेळी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल मो. आरिफ खान यांची भेट घेणार असून, 1949 मधील महाबोधी टेंपल अॅक्ट रद्द करण्याची मागणी करणार आहेत.
रामदास आठवले यांनी जोरदार भूमिका घेत "महाबोधी महाविहाराच्या ट्रस्टमध्ये 4 हिंदू आणि 4 बौद्ध ट्रस्टी असावेत" हा नियम अन्यायकारक असल्याचे सांगितले. "बौद्ध धर्मीयांचे सर्वाधिक पवित्र स्थळ असलेल्या या महाविहारावर केवळ बौद्धांचाच अधिकार असायला हवा," अशी ठाम मागणी त्यांनी केली. बुद्धगयेतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आठवले थेट बिहारमध्ये मुक्काम ठोकणार असून, संपूर्ण देशभर रिपब्लिकन पक्ष या लढ्यात सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाड येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापनदिनी आयोजित जाहिर सभेत आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी "महाबोधी महाविहार मुक्तीसाठी आंबेडकरी जनता आणि बौद्ध भिक्खूनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा मजबूत करावा," असे भावनिक आवाहन केले. रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही हा विषय मांडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मोदी सरकारने बिहारच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश द्यावेत आणि महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या जाहिर सभेला रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. सभेपूर्वी रामदास आठवले यांनी महाड येथील क्रांतीस्तंभाला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहाची आठवण जागवली तसेच महाबोधी टेंपल अॅक्ट रद्द करण्याच्या मागणीला सरकारने दखल घेतली नाही, तर संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील आठवले यांनी दिला आहे.