गागोदे खुर्दमध्ये आरक्षण घोटाळा? अनुसूचित जातीचा हक्क हिरावला...

गागोदे खुर्दमध्ये आरक्षण घोटाळा? अनुसूचित जातीचा हक्क हिरावला...
    "बौद्ध समाजाला सरपंच आरक्षणातून वगळले; गागोदे खुर्दात संतापाची लाट"


पेण | जतिन मोरे
    पेण तालुक्यातील ग्रामपंचायत गागोदे खुर्द येथे सरपंच पदासाठी यापूर्वी जाहीर झालेल्या अनुसूचित जाती आरक्षण अचानक रद्द केल्याने सिद्धार्थ नगर बौद्धवाडी परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटत आहे. या बदलाविरोधात स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार पेण यांच्याकडे संयुक्त हरकत अर्ज दाखल केला आहे.
         दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जाहीर आरक्षण सोडतीनुसार गागोदे खुर्द सरपंच पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. परंतु दि. ७ जुलै २०२५ रोजीच्या नव्या आदेशानुसार अनुसूचित जातीचे आरक्षण रद्द करून ‘अनुसूचित जमाती (खुला)’ वर्गाला सरपंच पद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, गावाच्या एकूण लोकसंख्येपैकी २५% हून अधिक संख्या अनुसूचित जातीची असतानाही या समाजातील व्यक्तींना आजवर सरपंचपदासाठी कधीही संधी मिळालेली नाही, असे हरकत अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच, ‘अनुसूचित जमाती’ वर्गाची या गावात वस्तव्यमूल्य शून्य असूनदेखील त्यांना आरक्षण देणे हा स्थानिकांचा अपमान असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत दिलेले आरक्षण अनुचित व अन्यायकारक असून त्यात तातडीने सुधारणा करून बौद्ध समाजास म्हणजेच अनुसूचित जातीस न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी अर्जकर्त्यांनी केली आहे. आरक्षणातील हा अचानक बदल निवडणूक प्रक्रियेमध्ये पक्षपातीपणाला खतपाणी घालणारा असून, तो सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासणारा आहे, असे ठाम मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

रिसमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस