सुधागडातील प्रगत शेतकरी नथू गायकवाड अनंतात विलीन

शेती आणि सामाजिक कार्याचा मिलाफ असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
    सुधागडातील प्रगत शेतकरी नथू गायकवाड अनंतात विलीन

वावोशी | जतिन मोरे 
     सुधागड तालुक्यातील मौजे पंचशील नगर वाघोशी येथील ज्येष्ठ आंबेडकरी बहुजन चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते, सुधागड तालुका बौद्धजन पंचायत (र.जि. नं. 2756) चे जेष्ठ कार्यकर्ते व ग्रुप नं. 06 चे माजी अध्यक्ष नथू यशवंत गायकवाड (वय 84) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी आणि धम्म चळवळीतील एक अनुभवी मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना संपूर्ण परिसरात व्यक्त होत आहे.
            नथू गायकवाड हे केवळ सामाजिक कार्यकर्तेच नव्हते, तर स्वकष्टाने शेतीत भरघोस यश मिळवणारे एक आदर्श प्रगत शेतकरीही होते. त्यांनी वाघोशी येथे अडीच एकर शेती विकत घेऊन विविध हंगामी पिकांचे उत्पादन घेतले. भात, रबी पिके, काकडी, कलिंगड यांसारख्या पिकांची यशस्वी लागवड त्यांनी केली. दुबार पीक घेणे ही त्यांची शेतीतील खासीयत होती. याशिवाय, त्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवरही शेती करून भरघोस उत्पादन घेतले. दुग्धोत्पादनातही त्यांनी उत्तम कामगिरी केली. त्यांच्या या प्रयोगशील आणि मेहनती शेतीमुळे त्यांना कृषी विभागाकडून ‘प्रगत व प्रयोगशील शेतकरी’ पुरस्कार प्राप्त झाला होता. सामाजिक कार्याची त्यांना विशेष आवड होती. ते एक प्रेमळ, मनमिळावू व सर्वांशी संवाद ठेवणारे व्यक्तिमत्त्व होते. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी सुसंवाद राखत ते लोकांच्या सुखदुःखात सहभागी होत असत. त्यांनी सुधागड तालुका बौद्धजन पंचायतच्या माध्यमातून समाजातील अनेक वाद-विवाद सामोपचाराने सोडवले, अनेकांचे संसार वाचवले, आणि न्यायनिवाड्यांत शांतपणे पण ठामपणे भूमिका बजावली. आदिवासी, ठाकूर व बहुजन समाजाशी त्यांचे विशेष मैत्रीपूर्ण संबंध होते. सामाजिक प्रश्नांवर त्यांनी या समाजांमध्ये एकजूट घडवून आणण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या अनुभवाचे बोल अनेकांना मार्गदर्शक ठरले आहेत. ते नेहमीच कष्ट, मेहनत आणि काटकसरीने राहणे याविषयी सांगताना ते आपल्याजवळ जर 10 रु. असतील तर त्यामधील 4 रु. स्वतःजवळ नेहमीच राखून ठेवावे असा अनुभवाचा व मोलाचा सल्ला ते लोकांना देत असत. नथू गायकवाड यांनी आपल्या मुलामुलींमध्येही सामाजिक कार्याची आवड निर्माण केली. त्यांनी दिलेल्या आदर्श जीवनशैलीच्या शिकवणीचा त्यांच्या कुटुंबावर ठसा उमटलेला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला गायकवाड, दोन मुले दिनेश व मिलिंद गायकवाड, दोन मुली – अनिता ओव्हाळ व कल्पना कांबळे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. कालकथित नथू गायकवाड यांचे पुण्यानुमोदन व शोकसभा रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी, पंचशील नगर वाघोशी येथे आयोजित करण्यात आली आहे. परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या सभेस उपस्थित राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

ह.भ.प गणेश महाराज मांडे यांचे दुःखद निधन

आमदार महेंद्र थोरवे यांचा विधानसभेच्या तोंडावर मास्टर स्ट्रोक

रिसमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस