आजारपणातही नात्यांची ऊब जपणारे नामदेव वाळकू मोरे काळाच्या पडद्याआड

आंबेडकरी विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते; १५ फेब्रुवारीला खोपोलीतील नालंदा बुद्धविहारात शोकसभा व पुण्यानुमोदन

वावोशी | जतिन मोरे 
    वावोशी गावचे सुपुत्र व प्रेमळ, शांत स्वभावामुळे सर्वपरिचित असलेले नामदेव वाळकू मोरे (वय ७४) यांचे ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अकस्मित निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. १९५२ साली वावोशी येथे सामान्य कुटुंबात जन्मलेले नामदेव मोरे यांनी पुढे वडिलांच्या खोपोली येथील भातगिरणीतील नोकरीमुळे खोपोली येथे वास्तव्यास राहून कष्टमय जीवन जगले. ते खोपोलीतील इलॅविटर कंपनीमध्ये प्रामाणिकपणे काम करून आदर्श कामगार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्यांनी तीन मुले व एका मुलीला शिक्षण देऊन त्यांचा उत्तम सांभाळ केला. नामदेव मोरे यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, आपुलकीचा व माणुसकी जपणारा होता. नातेवाईक व मित्रमंडळींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. मागील पाच ते सहा वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजारामुळे ते बहुतांश वेळ घरीच असत; मात्र या काळातही त्यांनी फोनद्वारे सर्वांशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांच्या ख्याली-खुशालीची चौकशी केली आणि आपुलकीचा संवाद कायम जपला. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील माणुसकीची ऊब अधिक ठळकपणे जाणवत असे. ते भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते, तर त्यांच्या पत्नी रमाई मोरे या भारतीय बौद्ध महासभेच्या रायगड जिल्हा संघटिका म्हणून कार्यरत आहेत. घरातील वातावरणही बौद्ध धम्माचे संस्कार जपणारे आहे. बौद्ध धम्मातील ‘मंगल मैत्री’चा संस्कार त्यांनी आयुष्यभर जोपासला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी चैत्यभूमी, दादर येथे स्वयंसेवक म्हणून त्यांनी अविरत सेवा बजावली. आंबेडकरी साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम व नियमित वर्तमानपत्र वाचनाची त्यांना विशेष आवड होती. ते खोपोली येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम १५ फेब्रुवारी रोजी खोपोली येथील नालंदा बुद्धविहारात सकाळी ठीक ११:०० वा. आयोजित करण्यात आला असून, त्याआधी १४ फेब्रुवारी रोजी ह.भ.प. दत्ता महाराज (दोन्हे) पाटील यांचे प्रवचन सिद्धार्थ नगर येथील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी ठिक ७ वाजता होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो