खालापूर पंचायत समितीसमोर आरटीआय फेडरेशनचे बेमुदत साखळी उपोषण सुरू...

खालापूर पंचायत समितीसमोर आरटीआय फेडरेशनचे बेमुदत साखळी उपोषण सुरू...
     शासनाच्या आदेशांच्या पायमल्लीचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी


वावोशी | जतिन मोरे : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संलग्न आरटीआय फेडरेशन खालापूर यांच्या वतीने सोमवार दि. २३ फेब्रुवारी २०२६ पासून पंचायत समिती कार्यालय खालापूर समोर बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. पंचायत समिती कार्यालय व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून शासन परिपत्रकांचे (GR) पालन होत नसल्याचा गंभीर आरोप करत संबंधित गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
     उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे लेखी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असून, मागण्या मान्य होईपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपोषण सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

प्रमुख मागण्या ?
उपोषणकर्त्यांनी प्रशासनासमोर पुढील ठोस मागण्या ठेवल्या आहेत:
१. तालुक्यातील सर्व ग्रामसभांचे संपूर्ण वेळ व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे बंधनकारक करावे.
२. दर सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत सर्व ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयात अभिलेख नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत.
३. ऑक्टोबर 2005 पासून लागू असलेल्या माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4(1)(ब) मधील 1 ते 17 बाबींची अद्ययावत माहिती 31 डिसेंबर 2025 पर्यंत जाहीर करावी.
४. पंचायत समिती व सर्व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक हजेरी, हालचाल रजिस्टर, ओळखपत्र व गणवेश सक्तीचे करावेत.
५. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक करावे; खोटे भाडेकरार व ग्रामसभा ठरावांचे ऑडिट करून दोषींवर कारवाई करावी.

“तीन वर्षे निवेदने, तरीही कारवाई शून्य”
    संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, 2023 पासून वारंवार निवेदने, तक्रारी व उपोषणे करूनही गटविकास अधिकाऱ्यांकडून केवळ चालढकल करण्यात येत आहे. मागण्यांची अंमलबजावणी न करता उपोषणास परवानगी नाकारण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला.
“आम्ही कोणतीही परवानगी मागितलेली नाही. लोकशाही व्यवस्थेत लोकसेवकांनी जनतेसमोर जबाबदार राहिले पाहिजे,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

आंदोलनात कोण सहभागी?
               या उपोषणात अध्यक्ष वसंत पाटील, कार्याध्यक्ष एकनाथ पिंगळे, उपकार्याध्यक्ष परशुराम मिरकुटे यांच्यासह सुरेश गावडे, गजानन साळवी, पद्माकर खंडागले, वासुदेव पाटील, किशोर मोरे, मधुकर गुरव, किरण भोसले, धनाजी भुईकोट, श्याम घारे, शरद पाटील व पंढरीनाथ दरेकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

प्रशासनाची भूमिका काय?
      दरम्यान, पंचायत समिती प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मात्र, तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत हा संघर्ष तीव्र होत असून, पुढील काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द

तळोजा एम.आय.डी.सी परीसरात धावणार मेट्रो