वावोशीत (मल्हार नगर) येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
मान्यवरांकडून अहिल्याबाईंच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव; समाजहितासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन
वावोशी | जतिन मोरे : खालापूर तालुक्यातील वावोशी (मल्हार नगर) येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा, नामसप्ताह, महाप्रसाद, प्रतिमा पूजन व सत्कार समारंभ तसेच संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, मल्हारराव होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास खालापूर पंचायत समितीच्या सदस्या प्रमिला पाटील, वावोशीचे माजी सरपंच राजू शहासने, शिरवली ग्रामपंचायतीचे सरपंच महेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अनंत हिरवे तसेच पत्रकार जतिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अहिल्याबाई होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि समाजोन्नतीच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. सायंकाळी कोयणामाई प्रासादिक भजन मंडळ, मल्हार नगर यांच्या संगीत भजनाने वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर रात्री आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगला. गुरुवर्य बुवा विजय परब, बुवा चिंतामणी पांचाळ आणि बुवा संदीप लोके यांच्या सादरीकरणाला उपस्थित भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा जयंती महोत्सव सुरेश गोरे, किसन गोरे, रामचंद्र बर्गे, मालू ढेबे, लक्ष्मण ढेबे, राया ढेबे, विजय ढेबे, अजय ढेबे, भगवान ढेबे, बाबू ढेबे, संभाजी ठोंबरे तसेच जय मल्हार मित्र मंडळ आणि अहिल्या महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.
Comments
Post a Comment