भारताच्या सीफूड निर्यातीने रचला नवा विक्रम; ८.४६ अब्ज डॉलरची कमाई

फ्रोझन श्रिंप निर्यातीचे वर्चस्व कायम; अमेरिका आणि चीन भारतीय समुद्री उत्पादनांचे प्रमुख ग्राहक

वावोशी | जतिन मोरे : जागतिक बाजारपेठेतील विविध आव्हानांवर मात करत भारताने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सीफूड (समुद्री अन्न) निर्यातीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. समुद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एमपीईडीए) चे अध्यक्ष पी. जवाहर (आयएएस) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत भारताने १९.७२ लाख मेट्रिक टन सीफूडची निर्यात केली असून त्यातून ₹७३,८९०.४६ कोटी (८.४६ अब्ज अमेरिकन डॉलर) इतके उत्पन्न मिळाले आहे. प्रमाण आणि मूल्य या दोन्ही बाबतीत ही आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे.
     भारतीय सीफूड निर्यातीमध्ये फ्रोझन श्रिंप (गोठवलेली कोळंबी) हे सर्वाधिक मागणी असलेले उत्पादन ठरले. या उत्पादनातून एकट्या फ्रोझन श्रिंप ₹४९,०३७.९३ कोटी (५,६२४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर) इतका महसूल मिळाला. एकूण निर्यातीच्या प्रमाणात त्याचा ४०.१९ टक्के तर उत्पन्नात ६६.५२ टक्के हिस्सा राहिला. मागील वर्षाच्या तुलनेत श्रिंप निर्यातीच्या मूल्यात लक्षणीय वाढही नोंदविण्यात आली. आर्थिक वर्षात एकूण ७.९२ लाख मेट्रिक टन फ्रोझन श्रिंपची निर्यात करण्यात आली. यामध्ये अमेरिका हा सर्वात मोठा ग्राहक ठरला असून त्याने २.५६ लाख मेट्रिक टन श्रिंप आयात केले. त्यानंतर चीन, युरोपियन युनियन, दक्षिण-पूर्व आशियाई देश, जपान आणि मध्य पूर्व देशांचा क्रम लागतो. फ्रोझन फिश हे दुसऱ्या क्रमांकाचे निर्यात उत्पादन ठरले असून त्यातून ₹५,६५८.३७ कोटींचे उत्पन्न मिळाले. तर वाळवलेल्या समुद्री उत्पादनांच्या (ड्राईड आयटम्स) निर्यातीत मोठी वाढ होऊन या गटातून रु. ५,०७९.०९ कोटींचा महसूल मिळाला. फ्रोझन स्क्विड आणि फ्रोझन कटलफिश यांच्या निर्यातीतही चांगली वाढ नोंदविण्यात आली आहे. परदेशी बाजारपेठांमध्ये अमेरिका ही भारतीय समुद्री उत्पादनांची सर्वात मोठी आयातदार राहिली. अमेरिकेने ₹२०,२६३.२७ कोटी मूल्याचे आणि २.७९ लाख मेट्रिक टन सीफूड आयात केले. मात्र, अमेरिकेकडे होणाऱ्या एकूण निर्यातीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत काहीशी घट दिसून आली. दुसरीकडे, प्रमाणाच्या दृष्टीने चीन हा भारताच्या सीफूड निर्यातीचा सर्वात मोठा गंतव्य देश ठरला. चीनने ४.९० लाख मेट्रिक टन सीफूड आयात केले. युरोपियन युनियन, दक्षिण-पूर्व आशियाई देश, जपान आणि मध्य पूर्व हे देखील भारतीय समुद्री उत्पादनांसाठी महत्त्वाचे बाजार राहिले. निर्यातीची हाताळणी करणाऱ्या प्रमुख बंदरांमध्ये विशाखापट्टणम (विझाग), जेएनपीटी आणि कोची या बंदरांचा अग्रक्रम राहिला. भारतीय समुद्री उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत वाढती मागणी मिळत असल्याचे या विक्रमी निर्यातीवरून स्पष्ट होत असून देशाच्या निर्यात क्षेत्रासाठी ही मोठी आणि उत्साहवर्धक कामगिरी मानली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द

गागोदे खुर्दमध्ये आरक्षण घोटाळा? अनुसूचित जातीचा हक्क हिरावला...