उंबर्डेत संयुक्त जयंती महोत्सव जल्लोषात साजरा; महापुरुषांच्या विचारांचा जागर...

राजेश गायकवाड आणि एम. डी. कांबळे यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन; भीमगीतांनी रंगली सांस्कृतिक मैफल

पेण | जतिन मोरे 
    नवोदित सिद्धार्थ मित्र मंडळ आणि माता यशोधरा महिला मंडळ, उंबर्डे बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव तथा १३५ वा भीमोत्सव शनिवार, दि. ६ जून २०२६ रोजी उंबर्डे बौद्धवाडी (ता. पेण, जि. रायगड) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
      या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहणाने झाली. र. ना. कांबळे व गणपत कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष सुभाष वसंत कांबळे, समितीचे पदाधिकारी, माता यशोधरा महिला मंडळाच्या सदस्या तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच बुद्धविहारात सामुदायिक बुद्धवंदना व सूत्रपठन कार्यक्रम पार पडला. भगवान कांबळे आणि नारायण जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुपारनंतर महिला व मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. सायंकाळी आयोजित जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी धम्म प्रचारक एम. डी. कांबळे होते. प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले राजेश गायकवाड (पाली) यांनी तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. समाज परिवर्तनासाठी महापुरुषांचे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या सभेचे अध्यक्ष एम. डी. कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महापुरुषांचे विचार केवळ वाचनापुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. सामाजिक एकोपा, शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांच्या माध्यमातून समाज प्रगती साधू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास आरपीआयचे रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, दत्तात्रेय भोईर, कमलाकर म्हात्रे, बी. डी. गायकवाड, हिरामण भोईर, ॲड. राहुल गायकवाड, सुभाष भोईर, पत्रकार जतीन मोरे, पत्रकार समीर घायतळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रात्री सामुदायिक भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संकेत कांबळे व पार्टी (तीसे, ता. रोहा) तसेच गायिका दिपाली शिंदे व पार्टी (कल्याण) यांच्या बहारदार भीमगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवोदित सिद्धार्थ मित्र मंडळ, जयंती महोत्सव समिती, माता यशोधरा महिला मंडळ, तरुण मंडळ तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

खोपोलीत गुरुवार बाजारात चुकीच्या ठिकाणी धंदा करणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द

गागोदे खुर्दमध्ये आरक्षण घोटाळा? अनुसूचित जातीचा हक्क हिरावला...