खालापूरच्या दुर्गम भागात गर्भवती महिलेला उपचारासाठी आजही ‘झोळीचा’ आधार!
खालापूरच्या दुर्गम भागात गर्भवती महिलेला उपचारासाठी आजही ‘झोळीचा’ आधार!
प्रतिनिधी | खालापूर:
एकीकडे राज्य सरकारकडून डिजिटल इंडिया आणि गावोगावी विकासाच्या गंगा पोहोचल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातून एक अत्यंत क्लेशदायक आणि भीषण वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रस्ते आणि पायाभूत सुविधांअभावी एका गर्भवती महिलेला चक्क झोळीत टाकून मैलोनमैल डोंगराळ रस्त्यावरून दवाखान्यात नेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली. या घटनेमुळे डोंगर-दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांची आजही कशी परवड होत आहे, हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खालापूर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात वसलेल्या 'ऊंबरणेवाडी' येथील एका गर्भवती महिलेला अचानक प्रसूती कळा येऊ लागल्या. वाडीमध्ये कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने तिला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र, ऊंबरणेवाडीपर्यंत पोहोचण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नाही. अखेर गावकऱ्यांनी आणि नातेवाइकांनी तात्पुरती 'झोळी' तयार केली. या झोळीत त्या वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवती महिलेला झोपवून, खांद्यावर घेत डोंगर-दऱ्यांतून आणि खडतर वाटेवरून मैलोनमैल पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणि तेथून पुढे दवाखान्यात दाखल केले.
स्वातंत्र्याची अनेक दशके उलटूनही डोंगर-दऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी समाजाला मूलभूत हक्कांसाठी संघर्ष करावा लागत आहे. ऊंबरणेवाडी आणि परिसरातील दुर्गम भागातील नागरिकांना साध्या रस्त्याअभावी जीव मुठीत धरून राहावे लागते. पावसाळ्यात किंवा आणीबाणीच्या प्रसंगी येथील परिस्थिती अधिकच गंभीर बनते. आजच्या आधुनिक युगातही एखाद्या गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीचा आधार घ्यावा लागत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
शासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र संताप
विकासाच्या मोठ्या-मोठ्या गप्पा मारणारे राज्य शासन, स्थानिक प्रशासन आणि निवडणुकीपुरतेच तोंड दाखवणारे स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याविरोधात ऊंबरणेवाडीतील ग्रामस्थांनी आणि संपूर्ण खालापूर तालुक्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. "आम्हाला फक्त मतांचा जोगवा मागण्यासाठीच वापरले जाते का? आमच्या माता-भगिनींचे प्राण असेच धोक्यात घालणार का?" असा संतप्त सवाल आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे. या गंभीर घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का आणि ऊंबरणेवाडीला पक्का रस्ता मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा