सावरोली-खारपाडा रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी;
सावरोली-खारपाडा रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक पलटी;
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, दुकाने व विजेच्या खांबांचे नुकसान
प्रतिनिधी | खालापूर :
खालापूर तालुक्यातील सावरोली-खारपाडा रस्त्यावर कुंभीवली गावाजवळ तब्बल ३५० गॅस सिलेंडर वाहून नेणारा एक ट्रक अचानक पलटी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुर्दैवी घटना घडलेली नाही. मात्र, ट्रक रस्त्याशेजारी उलटल्याने परिसरातील काही दुकानांचे गाळे, विजेचे पोल आणि पाण्याच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भरलेले गॅस सिलेंडर असल्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हा गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक चावणे येथून पुण्याच्या दिशेने निघाला होता. कुंभीवली गावाजवळ आला असता चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्ता सोडून शेजारील खड्ड्यात उलटला. गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटल्याचे समजताच परिसरातील नागरिक धावून आले.
या घटनेची गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते उमेश गायकवाड यांनी तातडीने खालापूर पोलिसांना अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही ठिणगी पडून मोठा अनर्थ घडू नये यासाठी परिसरातील विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ 'हेल्प फाऊंडेशन' आणि गॅस व केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांना पाचारण केले. एक्सपर्ट धनंजय गिध यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून संपूर्ण परिस्थितीची व गॅस सिलेंडरची बारकाईने पाहणी केली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची गॅस गळती झाली नसल्याचे आणि सध्यातरी कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा