माथेरानच्या हनिमून पॉईंटवर बिबट्याचा थरार!

 माथेरानच्या हनिमून पॉईंटवर बिबट्याचा थरार! सीसीटीव्हीत कैद झाली श्वानासोबतची झडप; 

  पर्यटकांसह स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण


प्रतिनिधी | माथेरान, कर्जत
      
        ​पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माथेरान नगरीतून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. माथेरानमधील प्रसिद्ध 'हनिमून पॉईंट' परिसरात एका बिबट्याने थेट दर्शन दिले असून, त्याचा एका श्वानासोबत (कुत्र्यासोबत) झालेल्या झडपेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात सध्या प्रचंड भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

            ​मिळालेल्या माहितीनुसार, हनिमून पॉईंट परिसरातील स्थानिक दुकानदार सनगरे यांच्या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा संपूर्ण प्रकार रात्रीच्या सुमारास कैद झाला. रात्रीच्या शांततेत एक बिबट्या या परिसरात शिकारीच्या शोधात फिरत असताना अचानक तिथे असलेल्या एका श्वानाशी त्याची समोरासमोर झडप झाली. हा थरारक प्रसंग सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत असून, या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.         

 
  या थरारक घटनेत सुदैवाने कोणतीही मानवी जीवितहानी झालेली नाही. मात्र, ज्या भागात ही घटना घडली, तो 'हनिमून पॉईंट' परिसर पर्यटकांच्या गजबजाटासाठी ओळखला जातो. दिवसा येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे बिबट्याचा हा वावर चिंताजनक मानला जात आहे.

        ​बिबट्याच्या या थेट दर्शनामुळे स्थानिक नागरिक आणि व्यवसायिकांमध्ये भीती पसरली आहे. हनिमून पॉईंट आणि परिसरात वनविभागाने तातडीने रात्रीची गस्त वाढवावी, तसेच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.


​सूचना : बिबट्याचा वावर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगण्याचे व विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

MPCB चा धडाका; नियम मोडणाऱ्या तीन बड्या कंपन्यांवर कारवाईचा बडगा

लोधीवलीच्या माजी उपसरपंच मोहिनी निकाळजे काळाच्या पडद्याआड

कर्जतच्या कार्यक्रमात आरपीआय (आठवले) जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा मोठा निर्णय, सर्व पदे रद्द