पत्रकारितेतील प्रभावी नेतृत्व: रसायनीचे राकेश खराडे आता 'महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे कोकण विभागीय अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी राकेश खराडे यांची बिनविरोध निवड
रसायनी | प्रतिनिधी :
रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील नामांकित पत्रकार राकेश खराडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकार समूहात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वी राकेश खराडे यांनी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष ही पदे यशस्वीपणे भूषविली असून संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान देत त्यांनी पुढील वाटचाल केली आहे. कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्यावर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर तसेच मुंबई या जिल्ह्यांचे मुख्य प्रतिनिधित्व करण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी व राज्य संघटक संजय भोकरे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली असून, याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी प्रदान केले आहे.
निवडीनंतर बोलताना राकेश खराडे म्हणाले की, “महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची वाटचाल, संघटनेची उद्दिष्टे आणि पत्रकारांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर अधिक भर दिला जाईल. पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील.”
तसेच पत्रकारिता करत असताना सामाजिक बांधिलकी जपत संघटनात्मक विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.
राकेश खराडे यांच्या या निवडीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून पत्रकार समूहात आनंदाचे वातावरण आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा